गडचिरोली - प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्वत:च्या खांद्यावर मदतीच्या साहित्याची पोती चिखल तुडवत पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवली आहेत. त्यामुळे गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड व इतर विभाग प्रमुखांवर सोशल मीडियातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
हे ही वाचा - कधी संपणार भामरागड वासियांच्या नरकयातना?; दरवर्षी तुटतो जगाशी संपर्क
यावर्षीच्या पुरामुळे तब्बल सात वेळा भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला. तर ७ सप्टेंबरला आलेल्या पुरामुळे तब्बल तीन दिवस भामरागडसह तालुक्यातील अनेक गावे पाण्याखाली होती. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. पूर ओसरत असतानाच विविध सामाजिक संघटना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावल्या. जिल्हा परिषद गडचिरोलीच्या सर्व विभागांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून भामरागड पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी निधी गोळा केला. त्या निधीतून जीवनावश्यक वस्तू खरेदी करून भामरागडच्या कोटी ग्रामपंचायत अंतर्गत मरकणार या गावी स्वत: ही मदत पोहोचवली.
हे ही वाचा - मुसळधार पावसाने सातव्यांदा तुटला भामरागडचा संपर्क ; पूरग्रस्तांचे सर्वेक्षण करणारा चमू अडकला
या दुर्गम गावाची लोकसंख्या जेमतेम २४५ असून या गावात ५५ कुटुंब वास्तव्यास आहेत. या गावाला चारही बाजूने नदी असल्याने त्या गावापर्यंत मदत पोहोचू शकली नव्हती. मंगळवारी २४ सप्टेंबरला या गावी मदत पोहोचवण्यासाठी नदीतून नावेतून जाऊन मदतीचे सर्व साहित्य पलीकडील गावात पोहोचविण्यात आले. गावात जाण्यासाठी धड रस्ताही नसल्याने चिखलातून वाट काढत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतिरकर, मुख्य वित्त व लेखा अधिकारी विकास सावंत, जिल्हा आरोग्य अधिकारी शशिकांत शंभरकर, शिक्षणाधिकारी राघवेंद्र मुनघाटे असे अनेक अधिकारी यांच्यासह काही ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी गावात पोहोचले. अतिदुर्गम भागातील लोक कोणत्या परिस्थितीत जगतात? हे पहिल्यांदाच या निमित्ताने जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाहता आले.
हे ही वाचा - VIDEO गडचिरोली महापूर : रस्तेच नसल्याने पंचनाम्यासाठी अधिकारी-डॉक्टरांची कसरत