गडचिरोली - जिल्ह्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने भात रोवणीच्या कामांना वेग आला आहे. शनिवारी जिल्हाधिकारी दीपक सिंगला साखरा येथील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. यावेळी त्यांनी चक्क चिखलात उतरून भात (धान) लागवड केली. 'श्री' पद्धतीने भात लागवड केल्यास शेतकऱ्यांना अधिक नफा मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी 'श्री' पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी चिखलात उतरून केली भात रोवणी -
जिल्हा कृषी विभागातर्फे भात (धान) रोवणी शुभारंभ कार्यक्रम साखरा येथील युवराज उंदीरवाडे या शेतकऱ्याच्या शेतात आयोजित केला होता. जिल्हाधिकारी दीपक सिंगला, जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे, उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी कदम, तालुका कृषी अधिकारी वाहने आदी अधिकारी उंदीरवाडे यांच्या बांधावर पोहोचले. तेव्हा रोवणीसाठी तयार असलेल्या बांधातील चिखलात जिल्हाधिकारी स्वतः उतरताच, हे पाहून इतर अधिकारीही चिखलात उतरले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी 'श्री' भात लागवडीच्या पद्धतीचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना समजावून सांगितले. तसेच रोवणी करण्यासाठी असलेल्या महिला मजुरांनी जिल्हाधिकाऱ्यांना साथ दिली. स्वत: जिल्हाधिकारी चिखलात उतरून भात रोवणी करीत असल्याने शेतावर असलेल्या महिला मजूरही अवाक झाल्या होत्या. जवळपास अर्धा तास जिल्हाधिकाऱ्यांनी वाकून भात रोवणी केली. 'श्री' पद्धतीने भात लागवडीसाठी विविध ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात असून या पद्धतीमुळे शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार असल्याची प्रतिक्रिया जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी दिली.
हेही वाचा - मी खडसेंच्या सीडीची वाट बघतोय - राज ठाकरेंची खोचक प्रतिक्रिया