गडचिरोली - कोरोनाचा वाढता प्रभाव टाळण्यासाठी हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाच्या महिला कार्यकर्त्यांनी 2 हजार 500 मास्कचे आदिवासींना वाटप केले आहे. अहेरी तालुक्यातील मेडपल्ली येथील गरीब गरजूंना मास्कचे वाटप करून मास्कचा वापर करण्याबाबत या महिलांनी जनजागृती केली.
जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी जगातील अनेक देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. भारतातही कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे मास्कचा वापर करण्यासाठी प्रशासनाकडून वारंवार सूचना देण्यात येत आहेत. त्यामुळे लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून गरजू गरिबांना 2 हजार 500 मास्कचे वाटप करण्यात आले.