गडचिरोली - जिल्ह्यातील भामरागड येथील नगर पंचायत प्रशासनाकडून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आली आहे. बाहेर गावातून येणाऱ्या वाहनांवर निर्जंतुकीकरण फवारणी करण्यासाठी भामरागड प्रवेशद्वाराजवळ टीम तैनात करण्यात आली आहे.
बुधवारी इथले लोक बाहेरुन येणाऱ्या प्रत्येक वाहनावर निर्जंतूकरणाची फवारणी करत होते. यानंतरच या गाड्यांना भामरागड शहरात प्रवेश दिला गेला. बुधवारी भामरागडचा बाजार असतो. हा बाजार बंद असला तरी लोक मोठ्या प्रमाणात शहराककडे येत होते. हे लक्षात येताच सकाळी अकरा वाजतापासून नगरपंचायत प्रशासनाने फवारणी मोहीम सुरू केली.
बाहेरुन येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची विचारपूस करून त्यांनी स्वतःची आरोग्य तपासणी केली की नाही, याबाबत सखोल चौकशी ही या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली. अशाच प्रकारे बँक, एटीएम, पोस्ट, तहसील, दवाखाने इत्यादी कार्यालय परिसरांतही फवारणी करण्यात आली. स्वच्छतेसाठी नगर पंचायत कर्मचारी निरंतर सेवा देत आहेत. त्यामुळे संपूर्ण तालुका सुरक्षित असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.