गडचिरोली - नक्षलवाद्यांनी भ्याड हल्ला केला, हे दुर्देवी आहे. आता त्यांच्या विरोधात आमचा प्लॅन तयार आहे. तो लवकरच दिसेल, असे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी म्हटले आहे.
पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी गडचिरोलीच्या जांभुरखेडा गावाजवळ झालेल्या हल्ल्याच्या घटनास्थळाचा आढावा घेतला. घटनास्थळी भेट देऊन त्यांनी घटना स्थळावरील संपूर्ण माहिती घेतली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
जयस्वाल म्हणाले, हल्यानंतर पोलिसांच्या गाडीचे तुकडे झाले, शस्त्रे दूरपर्यंत फेकली गेली. हल्ल्यावेळी पोलीस दल गाफील होते, असे नाही. या हल्ल्यातून नक्की धडा घेऊ. या हल्ल्यात एका खासगी बस चालकाचाही मृत्यू झाला. त्यालादेखील शहिदाचा दर्जा देण्यात येणार, असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या वाहन चालकाच्या कुटुंबीयांना मदतदेखील दिली जाणार आहे. त्याबरोबरच हल्ल्यामध्ये वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबीयांना मदत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हल्ल्यानंतर मिळालेल्या प्रत्येक माहितीची पडताळणी होत आहे. सर्व आव्हानांचा सखोल अभ्यास करुन नक्षलवाद्यांना चोख उत्तर देणार आहोत. तीच ती चूक परत करायला कोणालाच आवडत नाही. तसेच आमच्या मनोबलाचे खच्चीकरण होणार नाही यासाठी प्रयत्न करणार आहोत. मी स्वत: गडचिरोलीच्या एसपी पदावर काम केले आहे. १९९२-१९९५ च्या काळात मी गडचिरोलीचा एसपी पदावर होतो. मात्र, त्यावेळची परिस्थिती फार वेगळी होती, असेही जयसवाल म्हणाले.