गडचिरोली - कुरखेडा व चामोर्शी तालुक्यात कोरोनाचे ५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे सतर्कतेचा भाग म्हणून प्रशासनाने जिल्ह्यातील १० ठिकाणे कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केली आहेत. पोलिसांनी सोमवारी संध्याकाळी ही ठिकाणे प्रतिबंधीत केली असून, नागरिकांचे आवागमन बंद करण्यात आले आहे.
सोमवारी संस्थात्मक विलगीकरणात असलेले कुरखेडा तालुक्यातील ४ व चामोर्शी तालुक्यातील १ असे एकूण ५ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यामुळे जिल्हाभरात खळबळ उडाली. प्रशासनानेही कठोर पावले उचलत निर्बंध आणखी कडक केले. याचाच एक भाग म्हणून कुरखेडा शहरातील शासकीय मुलांचे वसतिगृह परिसर, शासकीय मुलींचे वसतिगृह परिसर, गांधीवॉर्ड, येंगलखेडा हे संपूर्ण गाव, नेहारपायली हे संपूर्ण गाव, चिचेवाडा हे संपूर्ण गाव कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले आहे.
शिवाय चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा परिसर व लगतचा निवासी भाग, मुलचेरा तालुक्यातील विश्वनाथनगर गावच्या उत्तरेकडे सुखदेव प्रल्हाद व शेखर गोविंदा मंडल यांच्या घराजवळचा परिसर, विश्वनाथनगर येथील दक्षिणकेडे संतोष राजन सरकार व नवीन नित्यानंद सरकार यांच्या घराजवळचा परिसर, तसेच विश्वनाथनगर येथील पूर्वेकडे दीपक दत्ता व जोदुनाथ राजन मिस्त्री यांच्या घराजवळचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. या ठिकाणी नाकेबंदी करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
कुरखेडा येथील शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून हनुमान मंदिरापर्यंतचा भाग सील करण्यात आला आहे. हा भाग गांधी वॉर्ड (बुरड मोहल्ला) म्हणून ओळखला जातो. या भागात एक प्रवासी वाहतूक करणारा वाहन चालक वास्तव्य करतो. त्यानेच १२ मजुरांना संस्थात्मक विलगीकरणासाठी आपल्या वाहनातून नेले होते. हे मजूर एकाच वाहनात गर्दीने बसले होते आणि त्यातील चार जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे या वाहन चालकालाही कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका लक्षात घेता आरोग्य विभागाने त्याचे स्वॅब नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविले आहेत. हा वाहन चालक अनेकांच्या संपर्कात आला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तो वास्तव्य करत असलेला भूभाग पोलिसांनी आज संध्याकाळी सील केला. शिवाय संस्थात्मक विलगीकरण असलेला भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. विशेष म्हणून सील केलेल्या वॉर्डात अनेक कर्मचारी व किराणा व्यावसायिकही वास्तव्य करतात. आता त्यांच्या ये-जा करण्याविषयी अडचण निर्माण होणार आहे. प्रशासन त्यांची कशी व्यवस्था करते, हे पाहावं लागेल.
हेही वाचा - क्वारंटाइन सेंटरमधील ५ जणांना कोरोनाची लागण, मुंबईतून आले होते गडचिरोलीत