गडचिरोली - केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात मागील 12 दिवसांपासून शेतकरी दिल्लीत निदर्शने करत आहेत. या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीही आक्रमक झाल्याचे दिसून आले. युवक काँग्रेसच्या वतीने सोमवारी गडचिरोली शहरात केंद्र सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून कृषी कायद्याचा निषेध नोंदवण्यात आला.
कृषी कायद्याचा देशभर विरोध
केंद्र सरकारने तीन कृषी विधायक काढले आहेत. त्याला देशभरातून विरोध होत हे विधेयक मागे घेण्याची मागणी जोर धरत आहे. त्यासाठी पंजाब, हरियाणातील शेतकरी दिल्लीमध्ये आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते दिल्लीकडे रवाना झाले. सोमवारी गडचिरोलीच्या इंदिरा गांधी चौकात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांच्या उपस्थितीत युवक काँग्रेसचे महेंद्र ब्राह्मणवाडे, कुणाल पेंदोरकर आदी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून जोरदार घोषणाबाजी केली.
![congress protest against farmer act](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-gad-congress-andolan-7204540_07122020143656_0712f_1607332016_813.png)
मागील बारा दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून केंद्र सरकारकडून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. राजधानीत मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलाय. काही ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचेही चित्र होते. सध्या सर्व शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमावर्ती भागात तळ दिला असून मोठ्या प्रमाणात शेतकरी या ठिकाणी दाखल झाले आहेत.
जिल्हाभर करणार आंदोलन
केंद्र सरकारने कृषी विधेयके रद्द करण्यासाठी जिल्हाभर आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा काँग्रेस कमिटीने दिला आहे. आज करण्यात आलेल्या अंतयात्रा आंदोलनात युवक काँग्रेसचे अनेक पदाधिकारी सहभागी होते.