गडचिरोली - महाराष्ट्र दिनी गडचिरोलीतील जाबुंरखेडा गावात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पोलीस दलाच्या सी-६० पथकातील १५ जवानांना वीर मरण आले. त्यानंतर आज त्यांना गडचिरोलीतील जिल्हा मुख्यालयाच्या परिसरात शासकीय मानवंदना देण्यात आली. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जवानांना श्रद्धांजली वाहिली.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की गडचिरोलीची घटना अत्यंत गंभीर आहे. हा भ्याड हल्ला आहे. यात आमच्या १५ जवानांना वीरमरण आले आहेत. एक चालक ही मृत्यूमुखी पडला आहे. या प्रकरणाची महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक स्वत: याची चौकशी करतील. गेल्या २ ते ३ वर्षात नक्षलवाद्यांचा बीमोड केला आहे. त्यामुळेच हा हल्ला झाला आहे. मात्र, या जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जाईल. यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने नक्षलवादीविरोधी कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, की या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली जाईल. जवळपास एकूण एक कोटी रुपयांपर्यंतचा मदत निधी या सर्व जवानांच्या कुटुंबीयांना देण्यात येईल. तसेच त्यांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.