गडचिरोली - 1 मे 2019 रोजी कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला होता. पुलाखाली झालेल्या या स्फोटात वाहन चालकासहित जिल्हा पोलीस दलाचे 15 जवान मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला जबाबदार असणाऱ्या आठ आरोपींवर राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) बुधवारी(दि.04डिसेंबर)सा दोषारोपपत्र दाखल केले.
1 मे रोजीच्या घटनेनंतर पुराडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने गडचिरोली पोलीस दलाने वेगाने तपास करत जहाल नक्षलवादी उप्पुगंटी निर्मलाकुमारी ऊर्फ नर्मदाक्काला तिच्या पतीसहीत (सत्यनारायण ऊर्फ किरण) अटक केले. तसेच दिलीप श्रीराम हिडामी, परसराम मनिराम तुलावी, सोमसाय दलसाय मडावी, किसन सिताराम हिडामी, सकरु रामसाय गोटा, कैलास प्रेमचंद रामचंदानी अशा आठ मुख्य आरोपींना ताब्यात घेण्यात आले. यानंतर शासनाच्या आदेशानुसार गुन्ह्याचा तपास NIA (National Investigation Agency)कडे वर्ग करण्यात आला. आता गडचिरोली पोलीस दलाने अटक केलेल्या सर्व आरोपींवर एनआयएने दोषारोप पत्र दाखल केले आहे.