गडचिरोली - दरवर्षी पावसाळ्यात भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला जातो. पाऊस जास्त झाल्यास पर्लकोटा वरील पुल व इतर नाले भरून वाहतात परिणामी भामरागडचा संपर्क तुटतो. अशावेळी गरोदर मातांच्या प्रसुती दरम्यान काही अडचणी निर्माण झाल्यास त्यांना तातडीने अहेरी किंवा गडचिरोली येथे शस्त्रक्रियेसाठी नेणे अवघड होता. यामुळे पहिल्यांदाच स्त्रीरोग तज्ञ, भूल तज्ञ, बालरोग तज्ञ व तीन प्रशिक्षित नर्स यांचा चमू भामरागड येथे पुढील काही दिवस गरोदर मातांसाठी आरोग्य सेवा पुरविणार आहे. जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी गेल्या आठवड्यात जिल्हा शल्य चिकित्सक यांना याबाबत सूचना केल्या होत्या. आता विशेष आरोग्य पथक भामरागडला दाखल झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील गरोदर मातांना दिलासा मिळणार ( Cesarean section for pregnant mothers in Bhamragarh ) आहे.
जिल्ह्यातील घणदाट जंगल व नदी नल्याने व्यापलेल भामरागड तालुका दरवर्षीच पावसाळ्यात संपर्क तुटणारा तालुका म्हणून ओळखला जातो. भामरागड तालुक्याला राज्यपालांनी दत्तक घेतले आहे. मात्र, तालुक्यातील शंभरहून अधिक गावांमध्ये जाण्यासाठी धड रस्ता नाही. परिणामी गावात रुग्णवाहिका पोहोचत नाही. त्यामुळे झोपण्याच्या खाटेलाच रुग्णवाहिका करुन दोन माणसांच्या खांद्यावर रुग्णाला रुग्णालयात पोहचावे लागते. वेळेवर उपचाराअभावी तालुक्यात आज पर्यंत अनेक दुर्दैवी घटना घडल्या. भामरागड ग्रामीण रुग्णालयात पोहचल्यानंतरही पुरेशी सेवा मिळत नव्हती. त्याची दखल जिल्हाधिकारी संजय मीना यांनी घेतली.
त्यानंतर जिल्हाधिकारी मीना संजय मीना यांनी गेल्या आठवड्यात याबाबत जिल्हा शल्य चिकत्सक अनिल रुडे यांना सूचना केल्या. त्याच पार्श्वभूमीवर इतिहासात पहिल्यांदा स्त्रीरोग तज्ञ, भूल तज्ञ, बालरोग तज्ञ व तीन प्रशिक्षित नर्स यांचा चमू भामरागड येथे दाखल झाला आहे. हे पथक गरोदर मातांना आरोग्य सेवा पुरवणार आहे. येथील ग्रामीण रुग्णालयचे मेडिकल डॉ. सचिन विभुते यांच्या देखरेखीत डॉ. मंगश कांबळे, डॉ. भुवनेश्वर कुणे, डॉ. माशेरे,डॉ. मित्तल गेडाम, डॉ. भावेश वानखेडे व आरोग्य चमुने जोमाने आरोग्य सेवेला सुरुवात केली आहे.
दर सात दिवसांनी बदलणार पथक - सध्या भामरागड ग्रामीण रूग्णालयात गरोदर मातांसाठी निवारागृह तयार करण्यात आले आहे. त्या ठिकाणी पावसाआधीच १९ गरोदर मातांना ठेवण्यात आले आहे. ५० गरोदर माता राहू शकतील, अशी व्यवस्था येथे करण्यात आली आहे. तसेच, जवळच असलेल्या विविध प्राथमिक आरोग्य केंद्रातील गरोदर माताही गरजेनूसार भामरागड येथे दाखल होणार आहेत. तर, दर सात दिवसांनी हे पथक बदलणार असून दरवर्षी पावसाळ्यात येणारी अडचण प्रशासनाने सोडविली आहे.