गडचिरोली - केंद्रीय गृहमंत्रालयाचे वरिष्ठ सुरक्षा सल्लागार के. विजय कुमार, सीआरपीएफचे महासंचालक डॉ. ए. पी. माहेश्वरी, पश्चिम क्षेत्र सीआरपीएफचे महानिरीक्षक संजय लाटकर यांनी सोमवारी गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त धानोरा तालुक्यातील गोडलवाही येथे तैनात असलेल्या सीआरपीएफ 113 बटालियनच्या डी कंपनीला भेट देऊन नक्षल स्थितीचा आढावा घेतला. तसेच जवानांसोबत संवाद ्सधला.
हेही वाचा - COVID-19 : भारतातील कोरोना रुग्णांची राज्यनिहाय आकडेवारी, वाचा एका क्लिकवर..
यावेळी सैनिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनाला संबोधित करताना डॉ. माहेश्वरी यांनी नक्षलग्रस्त भागात तैनात जवानांनी अधिक सतर्क राहून आपले कार्य करावे. तसेच स्थानिक नागरिकांच्या जनसंपर्कावर भर द्यावे, असे सांगितले. तसेच नक्षलवाद व वर्तमान रणनिती याबाबतची माहिती जाणून घेतल्याने जवानांचे मनोबल वाढण्यास मदत झाली. जवानांसोबत संवाद साधून नक्षलविरोधी मोहीम राबवताना तसेच कॅम्पमध्ये काही अडचणी येतात काय, याबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी अधिकाऱ्यांनी सीआरपीएफच्या कॅम्पचे निरीक्षण करून वृक्षारोपण केले.
दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कॅम्पमधील स्वच्छता, निटनेटकेपणा व जवानांचे वाढलेले मनोबल याबाबत प्रशंसा केली. यावेळी पोलीस उपमहानिरीक्षक अनिलकुमार सिंह, संजय कुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, द्वितीय कमान अधिकारी राजपिलसिंग, उपकमांडंट ए. के. अनस, प्रमोद शिरसाट, सहायक कमांडंट रवी गणवीर उपस्थित होते.