गडचिरोली - राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनर्निरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कामात कसूर करणाऱ्या १९ शासकीय कर्मचाऱ्यांविरोधात अहेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
निवडणूक आयोगाच्या ११ नोव्हेंबर आणि २३ डिसेंबर २०१९ मधील पत्रानुसार, १ जानेवारी २०२० या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचा विशेष सक्षिप्त पुनर्निरिक्षण कार्यक्रम निर्धारीत करण्यात आला होता. यानुसार ११ नोव्हेंबर २०१९ ते १३ फेब्रुवारी २०२० या कालावधीत मतदार पडताळणी कार्यक्रम राबविणे आवश्यक होते. मात्र, अहेरी तालुक्यातील अनेक गावात कार्यरत असलेल्या जवळपास १९ कर्मचाऱ्यांनी हे काम अद्यापही सुरू केले नव्हते. नेमून दिलेले कर्तव्य पार पाडण्यासंदर्भात त्यांना कळविण्यातही आले होते.
हेही वाचा - दिल्ली विधानसभा निवडणूक : 108 वर्षांच्या आजीने बजावला मतदानाचा हक्क
दरम्यान, १३ जानेवारी २०२० रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात सभा घेण्यात आली होती. यावेळी सदर कामाला सुरवात करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, या कर्मचाऱ्यांनी १४ जानेवारी २०२० रोजी एका निवेदनाद्वारे नेमून दिलेले काम पार पाडण्यास स्पष्टपणे नकार दिला. त्यानंतर वाजवी कारणाशिवाय अधिकृत कर्तव्याचा भंग केल्याचा ठपका ठेवत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीनंतर अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हेही वाचा - कर्नाटक: उसतोड कामगारांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर पुलावरून कोसळला; ६ जणांचा मृत्यू