गडचिरोली : जिल्ह्यातील अहेरी तालुक्याच्या सीमेवरुन वाहणाऱ्या प्राणहिता नदीवरील वांगेपल्ली घाटावर तेलंगणा सरकारने केवळ दोन वर्षात 100 कोटींच्या पुलाचे बांधकाम पूर्ण केले. या पुलाचे काही किरकोळ कामे पूर्ण झाल्यानंतर लवकरच पुलाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या पुलामुळे दक्षिण गडचिरोली भागातील नागरिकांना तेलंगणामध्ये आंतरराज्यीय वाहतूक करणे अतिशय सुलभ होणार आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या चंद्रपूर सीमेवर वैनगंगा, तेलंगणा राज्याच्या सीमेवर प्राणहिता व गोदावरी या नद्या आहेत. वैनगंगा नदीवर अनेक ठिकाणी पूल उभारण्यात आले. त्यामुळे आंतरजिल्हा वाहतुकीस कोणतीही अडचण नाही. मात्र, दक्षिण गडचिरोली भागातील सिरोंचा तालुक्याच्या सीमेवरुन वाहणाऱ्या गोदावरी, अहेरी तालुक्याच्या सीमेवरुन वाहणाऱ्या प्राणहिता या नद्यांवर कुठेच पूल नव्हता. या भागातील नागरिकांना आरोग्याच्या किंवा कोणत्याही कामासाठी गडचिरोली मुख्यालय गाठण्यासाठी दीडशे ते दोनशे किलोमीटरचा प्रवास करावा लागत असल्याने अनेकजण लगतच्या तेलंगणा राज्यात जाणे पसंत करत होते. मात्र, नदीवर पूल नसल्याने जीव धोक्यात घालून पाण्यातून किंवा नावेद्वारे वाहतूक चालायची. तत्कालीन गृहमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिवंगत आरआर पाटील यांच्या प्रयत्नामुळे सिरोंचा तालुक्याच्या सीमेवरील गोदावरी नदीवर पुलाचे बांधकाम झाले. तेव्हापासून या पुलावरून गडचिरोलीवरून थेट हैदराबाद बससेवा सुरू आहे. मात्र, अहेरीलगतच्या प्राणहिता नदीवरील वांगेपल्ली घाटावर पूल नसल्याने येथील अनेक नागरिक आजही नावेद्वारेच तेलंगणामध्ये जात आहेत. नागरिकांची मागणी लक्षात घेता, तेलंगणा सरकारने येथे शंभर कोटींच्या पूल बांधकामास मंजुरी दिली आणि केवळ दोन वर्षात या पुलाचे बांधकाम पूर्ण केले.
या पुलामुळे दक्षिण गडचिरोली भागातील नागरिकांना रेल्वे स्थानक गाठण्यासाठी केवळ 72 किलोमीटर अंतर कापावे लागणार आहे. यापूर्वी रेल्वेने प्रवास करायचे असल्यास दीडशे ते दोनशे किलोमीटर अंतर पार करत चंद्रपूर किंवा नागपूर गाठावे लागत होते. मात्र, वांगेपल्ली नदीघाटावर पूल झाल्याने 72 किमी असलेले कागजनगर रेल्वे स्थानक गाठणे सोयीचे होणार आहे. तिथून देशात कुठेही रेल्वे प्रवास करणे सोयीचे होईल. सध्या पुलाच्या रंगरंगोटीचे काम सुरू असून कोरोना संकट असल्याने पुलाचे लोकार्पणाचे काम लांबणीवर पडले आहे. मात्र, या पुलामुळे अहेरी, एटापल्ली तालुक्यातील नागरिकांना आंतरराज्यीय वाहतूक अतिशय सुलभ होणार आहे.