गडचिरोली - एटापल्ली तालुक्यातील विविध समस्यांना घेऊन केंद्र व राज्य सरकार विरोधात भाजप समर्थित व्यापाऱ्यांकडून शुक्रवारपासून बंद पाळण्यात येत आहे. सतत ४ दिवस बाजारपेठ बंद असल्याने छोटे व्यापारी व सामान्य नागरिकांना त्रास होत आहे. प्रशासनाने आंदोलनाची अजुन कोणतीही दखल घेततलेली नाही.
जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये विज्ञान शाखेचे वर्ग सुरु करावे, बंद असलेली इंग्रजी माध्यमांची मॉडेल स्कूल सुरु करावे, दूरसंचार सेवेचा दर्जा सुधारण्यात यावा, विद्युत बिलातील मीटर भाडे व विज अधिभार कमी करण्यात यावेत, एटापल्ली ते आलापल्ली रस्ता चौपदारी करावा व अहेरी जिल्हा निर्माण करण्यात यावा अशा मागण्या व्यापाऱ्यांनी आपले प्रतिष्ठाने बंद ठेऊन शासनाकडे केल्या आहेत.
आंदोलनात भारतीय जनता पक्ष जिल्हाउपाध्यक्ष बाबूराव गंपावार, भाजप आदिवासी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष दीपक फुलसंगे, शहर महामंत्री सचिन मोतकुरवार, भाजप समर्थित व्यापारी संघटनेचे महेश पुल्लूरवार, संदीप सेलवटकर, विशाल बाला, दिलीप पुपरेड्डीवार, नरेश गाइन, नित्यानंद दास, विजय गजाडीवार व राकेश तेलकुंटावार आदी पक्ष संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, जिल्हा परिषद हायस्कूलचे विद्यार्थी व दुकानदार सहभागी झाले आहेत.