गडचिरोली- राज्य शासनाच्या गृह विभागाने गुरुवारी उशिरा आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. यामध्ये मुंबई परिमंडळ दहाचे पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांची गडचिरोली जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. गडचिरोलीचे विद्यमान जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून तर अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग यांना बढती देत रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.
शैलेश बलकवडे यांनी गडचिरोली जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून काम करताना नक्षल कारवायांवर मोठ्या प्रमाणात अंकुश घालण्यात यश मिळवले. बलकवडेंच्या कार्यकाळात अनेक मोठ्या नक्षल कॅडरने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. मोस्ट वाँटेड नक्षलवादी सृजनक्का व तिच्या पतीलाही अटक करण्यात पोलिसांना यश आले होते.
पोलीस अधीक्षक म्हणून पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये त्यांनी चांगली प्रतिमा निर्माण केली होती. त्यांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने कोल्हापूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. अंकित गोयल नवे पोलीस अधीक्षक म्हणून रुजू होणार असून गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल कारवाया रोखण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर राहणार आहे.
दोन आठवड्यांपूर्वी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांची पदोन्नतीवर गडचिरोली विभागाचे पोलीस उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली होती. संदीप पाटील यांनी यापूर्वी गडचिरोलीमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून काम केले होते.
हेही वाचा-गोंधळाच्या गर्तेत देश गटांगळ्या खातोय; सामनातून शिवसेनेचा केंद्रावर हल्लाबोल