गडचिरोली - गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यातील रेतीघाटांचा लिलाव झालेला नाही. परिणामी घरकुल, ग्रामपंचायत अंतर्गत मंजूर झालेले रस्ते, नाले बांधकाम ठप्प पडलेले आहेत. अनेक बांधकाम कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या मजुरांनी सोमवारी परिवर्तन संघटनेच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलबंडी मोर्चा काढून जिल्ह्यातील रेती घाट लिलाव त्वरित सुरू करण्याची मागणी केली.
रेतीघाटांचा लिलाव झाल्यास शासकीय तसेच खासगी बांधकामांना वेग येणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील शेकडो बांधकाम मजुरांना काम मिळेल. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ जिल्ह्यातील रेतीघाटांचा लिलाव करावा. रेतीघाटांचा लिलाव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत प्रतिदिन तीन फेऱ्या बैलबंडीने रेती वाहतूक करण्याची परवानगी द्यावी, अशा मागणी मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. दरम्यान शेकडोंच्या संख्येने बैलबंडीधारक मोर्चात सहभागी झाल्याने वाहतुकीची समस्या लक्षात घेता इंदिरा गांधी चौकातच बैलबंडी अडवून मोर्चेकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आले. सात जणांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले.