गडचिरोली - जिल्ह्यात महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर गोदावरी नदीवर तेलंगाणा सरकारने 82 हजार कोटी रुपये खर्च करून भव्य असा मेडीगड्डा कालेश्वर प्रकल्प साकारला आहे. मात्र या प्रकल्पामुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीमुळे बुधवारी सिरोंचा तालुक्यातील दहा गावातल्या शेतकरी नागरिकांनी धरणे आंदोलन करुन तेलंगाणा सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. आंदोलक आणि तेलंगाणा पोलीस समोरासमोर आल्यानंतर आंतरराज्यीय सीमेवर तणावाचे वातावरण तयार झाले होते.
विरोधानंतरही प्रकल्पाचे बांधकाम -
गडचिरोली जिल्हयातल्या सिरोंचा तालुक्यातल्या नागरिकांच्या विरोधानंतरही आंतरराज्यीय सीमेवर तेलंगाणा सरकारने बांधलेल्या भव्य प्रकल्पामुळे सीमावर्ती भागातल्या शेतकऱ्यांना गेल्या वर्षभरापासून नुकसानीला सामोर जावं लागत आहे. बुडालेल्या पिकांची नुकसानभरपाई अद्याप मिळाली नाहीच दुसरीकडे मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीकाठावरील शेतीची जमीन पाण्यात गेलीय. त्यात प्रकल्पाच्या ठिकाणी दोन राज्यात ये-जा करण्यासाठी उभारण्यात आलेला मोठा पुलही बंद करण्यात आल्याने आज दहा गावातल्या शेतकरी नागरिकांनी दिवसभर धरणे आंदोलन करुन तेलंगण सरकारविरोधात घोषणाबाजी केली. तिथे असलेल्या तेलंगाण पोलिसाच्या उपस्थितीने परिसराला छावणीचे स्वरुप आले होते. पोलीस आणि आंदोलक परस्परांसमोर उभे झाल्याने प्रकल्पाच्या ठिकाणी दिवसभर तणावाचे वातावरण होते.