गडचिरोली - शहरातून चामोर्शी मार्गावर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे. या कामाला सुरुवात करण्यापूर्वी नियोजनानुसार सर्वप्रथम पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन दुसरीकडे सरकवणे आवश्यक होते. मात्र, महामार्ग बांधकाम कंत्राटदाराने पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन न सरकवताच केमीस्ट भवनाजवळ रस्ता खोदून मोठा खड्डा तयार केला आहे. या खड्यात पाच ते सहा फुट दूषीत सांडपाणी साचले असून या चिखलयुक्त सांडपाण्याच्या दलदलीत पाणीपुरवठा करणारी पाईन सापडली आहे. यातून शहराला दूषीत पाण्याचा पुरवठा होत आहे.
पाईपलाईन शिफ्टींगसाठी पाईपचे ढिग शासकीय विज्ञान महाविद्यालयासमोर ठेवण्यात आले आहेत. मात्र, पाण्याच्या पाईपलाईनचे काम न करता शासकीय विज्ञान महाविद्यालय ते डॉ. कुंभारे यांच्या रूग्णालयापर्यंत रस्ता खोदण्यात आला. रस्ता खोदकाम करताना ठिकठिकाणी ही पाईनलाईन फुटली. त्यामुळे अनेकदा चामोर्शी मार्गावरील काही भागातील पाणीपुरवठा प्रभावीतही झाला. तसेच नळांना दुषीत पाणी येत होते. याबाबीकडे प्रसार माध्यमांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यामुळे पाईनपलाईनची दुरूस्ती करण्यात आली. मात्र, कंत्राटदाराने पाणीपुरवठा पाईपलाईन सरकवण्याकडे दुर्लक्ष केले.
चामोर्शी मार्गावरील केमीस्ट भवनावळ छोटा पुल असून या पुलाखालून पाण्याची मुख्य पाईपलाईन गेली आहे. याच पुलातून चामोर्शी मार्गावरील विवेकानंदनगर, रामनगर, रेड्डीगोडावून, कन्नमवार वार्ड या भागातील संपूर्ण सांडपाण्याचा निचरा होतो. कामासाठी कंत्राटदाराने रस्त्याच्या एका बाजूने खोदकाम करून पुलातील मोठ्या सिमेंटचे कॉलम काढून टाकले आहेत. तसेच याठिकाणी मोठा खड्डा तयार केला. खोदकाम करण्यापूर्वी सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य ती उपायोजना करणे आवश्यक होते. परंतू उपायोजना केलीच नाही. त्यामुळे सांडपाण्याचे डबके तयार झाले असून पाच ते सहा फुट सांडपाण्यात पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन सापडली आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.