गडचिरोली - भूसुरुंग स्फोट घडवून आणल्याच्या घटनेनंतर नक्षलवादी आणखी आक्रमक झाले आहेत. रविवारी भामरागड तालुक्यातील एकाची हत्या केल्यानंतर 24 तासातच पुन्हा एटापल्ली तालुक्यातील जंभिया गट्टा येथील एका नागरिकाची पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी हत्या केली. ही घटना सोमवारी उघडकीस आली. शिशिर रामचंद्र मंडल (वय 42 वर्षे) असे हत्या करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिशिर मंडल हा दुचाकी मेकॅनिक होता. तो पोलिसांना माहिती देत असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी त्याला उचलून नेत जंगल नेऊन हत्या केली व त्याचा मृतदेह रस्त्यावर फेकून दिला. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. सात दिवसातील ही चौथी घटना आहे. यापूर्वी महाराष्ट्र दिनाच्या पहाटे कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथे 27 वाहनांची नक्षलवाद्यांनी जाळपोळ केली होती.
या घटनेचा तपास करण्यासाठी जात असलेल्या पोलिसांच्या वाहनांला लक्ष्य करून भूसुरुंग स्फोट घडवण्यात आला. या स्फोटात 15 पोलीस जवानांसह एक खासगी वाहन चालकाला वीरमरण आले होते. या घटना ताज्या असतानाच काल रविवारी भामरागड तालुक्यातील एकाची नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. या घटनेलाही चोवीस तास उलटत नाही तोच आज पुन्हा एकाची हत्या केली व पत्रक टाकून ठेवले. या घटनेने गडचिरोली जिल्ह्यातील जाडपोळ व रक्तपात कधी थांबणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नक्षलवाद्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे पोलिसांनीही कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.