गडचिरोली - आंबे आणण्यासाठी नावेद्वारे नदी ओलांडून जात असताना नाव उलटली. यात तीन मुलींचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास चामोर्शी तालुक्यातील वाघोली नदी घाटावर घडली.
हेही वाचा - रानभाजी तोडण्यासाठी जंगलात गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार
वाघोली येथील केवटराम मनोहर शेंडे (वय 35), समृद्धी ढिवरी शेंडे (वय 11), सोनी मुखरू शेंडे (वय 13) व वाघोली येथे आपल्या मामाकडे आलेली येवली येथील पल्लवी रमेश भोयर (वय 15) वर्ष असे तिघे मिळून चंद्रपूर जिल्ह्यातील जुना सुरला येथे आंबे आणण्यासाठी नावेने वैनगंगा नदीपात्रातील पाण्यातून जात होते. दरम्यान लाट जोरात आल्याने नाव उलटून समृद्धी शेंडे, सोनी मुखरू शेंडे दोन्ही राहणार वाघोली व पल्लवी रमेश भोयर (रा. येवली ता.जी. गडचिरोली) या पाण्यात बुडून मरण पावल्या व नाव चालक केवटराम मनोहर शेंडे हा पोहून बाहेर आल्याने तो बचावला.
घटनेची माहिती मिळताच चामोर्शीचे तहसीलदार सिकतोडे व त्यांचे पथक, तसेच चामोर्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे, सहा.पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील म.पो.उप.नि पल्लवी वाघ वा त्यांचे पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा कारवाई करून घेऊन तिन्ही मुलींचे मृतदेह शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे पाठवले. शवविच्छेदन करवून घेऊन अंतिम विधीकरिता तिन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
हेही वाचा - 'मतदानासाठी वाहन घेऊन येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आता लसीकरणासाठीही जेष्ठांना न्यावे'