गडचिरोली - जिल्हा पोलीस दलातर्फे 'प्रयास' (POLICE REACHING OUT TO YOUTH & STUDENTS ) उपक्रमांतर्गत काल (शुक्रवार) गडचिरोली जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांमध्ये विर बाबुराव सेडमाके सामान्य ज्ञान तिमाही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत जिल्ह्यातील दुर्गम व अति दुर्गम भागातील १०२ आश्रमशाळांतील २१ हजार ५४७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या संकल्पनेतून अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा घेण्यात आली. संविधान दिनाचे औचित्य साधुन २६ नोव्हेंबर २०१८ पासून दररोज जिल्ह्यातील प्रत्येक आश्रमशाळेत १० सामान्य ज्ञानाचे प्रश्न व्हाट्सअॅपद्वारे संबंधीत आश्रमशाळेतील समन्वयक म्हणून नियुक्त केलेल्या शिक्षकांना पाठविले जात होते. त्या शिक्षकांमार्फत ते प्रश्न दैनंदिन परिपाठाच्या माध्यमातून त्यांच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना माहिती करुन देण्यात येत होते. या सर्व प्रश्नांतून ५० प्रश्नांची प्रश्न पत्रिका सामान्य ज्ञान तिमाही स्पर्धा परिक्षेत देण्यात आली होती.
या तिमाही परिक्षेत जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाने उतीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांस रोख रक्कम व प्रमाणपत्र तसेच प्रत्येक आश्रमशाळेतून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास प्रोत्साहनपर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. नक्षल प्रभावित अतिसंवेदनशिल गडचिरोली जिल्ह्याचा लोकशाही व शांततेच्या मार्गाने विकास कसा साधला जाईल, यासाठी गडचिरोली पोलीस दलातर्फे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम व योजना राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील अति दुर्गम व दुर्गम भागातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने तसेच त्यांचे बौध्दीक कला-गुणांना वाव मिळून त्यांना स्पर्धा परिक्षेची माहिती व्हावी म्हणून या उपक्रमाची सुरवात गडचिरोली पोलीस दलाने केली आहे.