गडचिरोली - रोजगाराच्या संधीपासून दूर राहिलेल्या आदिवासी युवकांच्या हाताला काम मिळावे यासाठी गडचिरोली पोलीस दलाने पुढाकार घेतला आहे. सीएलपी इंडिया आणि प्रथम एज्युकेशन फॉऊंडेशन यांच्या पुढाकाराने १७० बेरोजगार युवक-युवतींना हॉस्पिटॅलिटी ऑटोमोबाईल प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. याबाबत युवकांना शुक्रवारी जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
'रोजगार मेळावा' अँप ठरतोय दुवा-
अतिदुर्गम, नक्षलग्रस्त, अतिसंवेदनशिल गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासुन दूर राहणाऱ्या जिल्ह्यातील गरीब आदिवासी युवक-युवतींना रोजगाराच्या संधीचा फायदा वेळेवर मिळत नाही. याचाच फायदा घेत नक्षलवादी आदिवासी युवकांच्या शिक्षणाला विरोध करुन वेगवेगळया भुलथापा देतात. जनतेमध्ये लोकशाही विरुध्द अपप्रचार करतात व नक्षल दलममध्ये भरती होण्यास प्रवृत्त करुन आदिवासी युवक-युवतींचे भविष्य उद्ध्वस्त करतात. अनेक तरुण-तरुणी गुणवत्ताधारक आहेत. परंतु योग्य आत्मविश्वास व संधीच्या अभावामुळे ते रोजगाराकडे न वळता वाममार्गाकडे वळतात. हीच बाब विचारात घेवुन, गडचिरोली पोलीस दलाने “रोजगार मेळावा” हे अॅप तयार केले. या अॅप मध्ये पाच हजार बेरोजगार युवक-युवतींनी आपली नाव नोंदणी केली आहे.
आजपर्यंत १३४६ बेरोजगार युवक-युवतींना रोजगार -
रोजगार अॅपच्या माध्यमातून आतापर्यंत १३४६ बेरोजगार युवक-युवतींना रोजगार प्राप्त झाला आहे. इच्छुक बेरोजगार युवक-युवतींकरीता कौशल्यावर आधारीत विविध प्रशिक्षण सुध्दा राबविण्यात येत आहेत. नुकताच बी.ओ.आय. स्टार आरसेटी गडचिरोली मार्फतीने ९५ युवक-युवतींना ब्युटीपार्लर, कुक्कुटपालन व मत्स्यपालनचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सीएलपी इंडिया आणि प्रथम एज्युकेशन फॉऊंडेशन, यवतमाळ यांचे मार्फतीने १५० युवक-युवतींची हॉस्पिटॅलिटी युवक-युवतींची हॉस्पिटॅलिटी व ऑटोमोबाईल प्रशिक्षणाकरीता निवड झाली आहे.
गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकाराने हॉस्पिटॅलिटी व ऑटोमोबाईल प्रशिक्षणाकरीता निवड झालेल्या १५० युवक-युवतींचा नियुक्ती प्रमाणपत्र वाटप व सत्कार समारंभ शुक्रवारी पार पडला. कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) मनिष कलवानिया, पोलीस उपअधिक्षक अभियान भाऊसाहेब ढोले, प्रभारी पोलीस उपअधिक्षक डॉ. विशाल जयस्वाल,. प्रथम एज्युकेशन फॉऊंडेशनचे, प्रमुख क्लस्टर हेड आशिष इंगळे, रिजनल अकॅडेमिक हेड हॉस्पिटॅलीटी भाग्यश्री दशमुख्ने उपस्थित होते.