धुळे - धारदार हत्यारांनी वार करत एकाचा निर्घृण खून केल्याची घटना आज पहाटे शहरात उघडकीस आली आहे. मृताने जखमी अवस्थेत दुचाकीवर आपले घर गाठण्याचा प्रयत्न केला; मात्र तो अपयशी ठरला. काँग्रेस भवनसमोर तो जखमी अवस्थेत आढळून आला. याप्रकरणी शहर पोलिसात अज्ञात व्यक्तीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल माणिक गरूड असे मृताचे नाव आहे.
विशाल माणिक गरूड (वय ४३ रा. आंबेडकर चौक, अमरनगर, धुळे) असे मृताचे नाव आहे. मध्यरात्रीला सव्वाबारा ते एकच्या सुमारास कोणीतरी अज्ञात ठिकाणी त्यांच्या तोंडावर तीक्ष्ण हत्यारांनी वार करून त्यांना गंभीर जखमी केले. अशाही अवस्थेत त्यांनी दुचाकीवर घर गाठण्याचा प्रयत्न केल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे. नवीन महापालिकेकडून तहसील कार्यालयाकडे जाताना टॉवर बगीचा समोर विशाल हा दुचाकीवरून खाली पडले. तिथून पुन्हा उठून परत दुचाकीवर बसून निघाला असता काँग्रेसभवन समोर दुचाकी थांबवून खाली बसले. तेव्हा परिसरातील नागरिकांनी पाहिले असता त्यांच्या तोंडातून रक्त निघत असल्याचे दिसले.
हेही वाचा-सचिन वाझेचा 'कार'नामा; सात आलिशान गाड्या एनआयएच्या ताब्यात
रुग्णालयात मृत्यू-
नागरिकांनी तत्काळ शहर पोलिसांना कळविले. माहिती मिळताच एसडीपीओ दिनकर पिंगळे, शहर पोलीस ठाण्याचे पीआय नितीन देशमुख, एपीआय दादासाहेब पाटील व संतोष तिगोटे हे पथकासह दाखल झाले. तत्काळ जखमी तरुणाला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून विशाल गरूड यांना मृत घोषित केल्याची माहिती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली.
योगेश पंडीत पगारे (रा. आंबेडकर चौक, अमरनगर) यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एपीआय संतोष तिगोटे करीत आहेत.
हेही वाचा-परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सोमवारी फैसला, गृहमंत्र्यांवर केले आहेत भ्रष्टाचाराचे आरोप
मुलांबरोबर होणारी भेट अपुर्णच राहिली-
विशाल गरूड हे पत्नीशी घरगुती वाद असल्यामुळे ते एकत्र राहत नव्हते. त्यामुळे ते सुमारे तीन तीन वर्षापासून अमरनगरातील बहिण आशाबाई यांच्याकडे राहत होते. विशाल यांची पत्नी निलीमा व तीन मुले हे साक्री रोडवरील अंजिक्यतारा सोसायटी येथे राहतात. त्यामुळे विशाल गरूड हे आठवड्यातून दर शनिवारी त्यांना भेटायला त्यांच्या घरी जात होते. परंतु शुक्रवारीच विशाल गरूड याचा मृत्यू झाला. त्यामुळे शनिवारी मुलांबरोबर होणारी त्यांची भेट अपुर्णच राहीली.