धुळे - शहरातील मालेगाव रोड भागात असलेल्या विठ्ठल मंदिरातील यात्रोत्सव गेल्या ५४ वर्षात पहिल्यांदाच रद्द करण्यात आला. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने मंदिर बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे मंदिर परिसरात शुकशुकाट पाहायला मिळाला.
राज्यात आणि जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा आषाढी एकादशीचा उत्सव राज्य सरकारच्या वतीने रद्द करण्यात आला असून हा उत्सव घरीच साजरा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यातील सर्वच विठ्ठल मंदिरात भाविकांना दर्शनासाठी बंदी घालण्यात आली आहे. शहरातील मालेगाव रोड भागात प्राचीन विठ्ठल मंदिर आहे. सन 1966 साली हे मंदिर बांधण्यात आले. तेव्हापासून या मंदिरात दरवर्षी आषाढी एकादशीचा उत्सव साजरा करण्यात येत असतो. गेल्या 10 ते 15 वर्षांपासून या मंदिर परिसरात दरवर्षी आषाढी एकादशीला मोठी यात्रा भरते. मात्र, यंदा कोरोनाच्या संकटामुळे गेल्या 54 वर्षांची परंपरा असलेला यात्रोत्सव प्रथमच खंडीत झाला. यामुळे भविकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. यावेळी अनेक भाविकांनी रस्त्यावर थांबून विठुरायाच दर्शन घेतलं. दरवर्षी, हजारोंच्या संख्येने धुळेकर नागरिक याठिकाणी येऊन दर्शन घेत असतात. मात्र, यंदा मंदिर परिसरात शुकशुकाट पाहावयास मिळाला. यावेळी मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.