धुळे - जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील जातोडे गावात अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने महिलेला चिरडल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. या घटनेनंतर ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. कलाबाई सुदाम सिंग राजपूत (वय ४९) असे मृत महिलेचे नाव आहे.
जातोडा गावातील रहिवासी असलेल्या कलाबाई राजपूत या सकाळी कचरा टाकण्यासाठी घराबाहेर आल्या होत्या. यावेळी त्यांना भरधाव वेगाने आलेल्या आणि अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने चिरडले. या घटनेत कलाबाई राजपूत यांच्या शरीराचे दोन तुकडे झाले. ही घटना समजताच जातोडे बोरगाव येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन रास्ता रोको आंदोलन केले.
या घटनेनंतर वाळू माफियांनी जातोडे गावात येऊन गावकऱ्यांना धमकावल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वाळू माफियांचा ट्रॅक्टर जाळून टाकला. सध्या गावात तणावपूर्ण परिस्थिती आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जातोडे गावाकडे धाव घेतली. संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी ग्रामस्थांना दिले. मात्र, स्वतः जिल्हाधिकारी आल्याशिवाय कुठलाही निर्णय होणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.