धुळे - यंदा जून महिन्यात समाधानकारक पाऊस असेल या हवामान विभागाच्या अंदाजाने शेतकऱ्याला दिलासा मिळाला खरा मात्र तो क्षणिक ठरला. जून महिन्यात धुळे जिल्ह्यात केवळ सहा दिवस पाऊस झालाय. गेल्या वर्षी धुळे जिल्ह्यात जून महिन्याची जिल्ह्याची पर्जन्यमानाची सरासरी पाहता साधारण ९० टक्के पाऊस झाला होता. मात्र यंदा केवळ ७९.४ टक्के पाऊस झाला. याचा परिणाम शेतीवर होऊन यंदा धुळे जिल्ह्यात खरीपात जून अखेर ३५ टक्केच पेरणी ( Kharif season agricultural sector ) झालीय. पाऊस लांबला, पेरण्या खोळंबल्या परिणामी यंदा कडधान्याच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केलीय. मात्र बाजरी, तूर या पिकांचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केलाय.
धुळे जिल्ह्यातील मुख्य पीक कापूस - पांढरे सोने म्हणून ओळख असलेले कापूस हे धुळे जिल्ह्याचे मुख्य पीक आहे. धुळे जिल्ह्यात यंदा साधारण ४ लाख ३७ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाचे नियोजन आहे. यात सर्वाधिक म्हणजे सव्वा दोन लाख हेक्टर क्षेत्रावर पांढरे सोने अर्थात कापूस लागवड झाली आहे. त्या खालोखाल मका, ज्वारी, बाजरी या पिकांची लागवड झाली आहे.
१५ जुलैपर्यंत इतर पिकांची लागवड करू शकतात - धुळे जिल्ह्यात जून अखेर विस्कळीत स्वरूपाचा, पेरणीयोग्य असा पाऊस झालेला नाही. जमिनीत पुरेशी ओलावा निर्माण झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. पाऊस लांबल्याने कडधान्याचे क्षेत्र काही प्रमाणात कमी होईल. मात्र बाजरी, तूर या पिकांचे क्षेत्र वाढेल असा विश्वास कृषी विभागाचे शिंदखेडा तालुका कृषी अधिकारी विनय बोरसे यांनी व्यक्त केला आहे. कोरडवाहू कापूस ७ जुलैपर्यंत लागवड करता येऊ शकतो. तर १५ जुलैपर्यंत इतर पिकांची पेरणी करू शकतो, असेही शिंदखेडा तालुका कृषी अधिकारी विनय बोरसे यांनी सांगितले आहे.
उत्पन्नात साधारतः १५ टक्क्यांपर्यंत वाढ - पिकाची उत्पादकता वाढण्यासाठी शक्यतो घरच्याच बियाण्यांचा वापर करावा. मात्र या बियाण्यांची उगवण क्षमता तपासून घ्यावी. बाजारातून आणलेल्या बियाण्यांना जैविक खतांची प्रक्रिया करणे महत्वाचे आहे. जैविक खतांची प्रक्रिया केल्यास पिकाच्या उत्पन्नात साधारतः १५ टक्क्यांपर्यंत वाढ होत असते, असा दावा कृषी विभागाचा आहे. कृषी विद्यापीठाने शिफारशी केलेल्या वाणाचा, बियाण्यांचा, खतांचा, औषधांचा वापर करावा. फवारणीची घाई करू नये. कीड व्यवस्थापनासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करावा. कोरडवाहू कापूस पिकात आंतरपीक म्हणून मूग, उडीद ही पिके घ्यावीत. यामुळे जमिनीत ओलावा राहण्यास, जमिनीतील नत्र स्थिर करण्याच्या कामास मदत होईल. अश्या अनुषंगाने कमी खर्चाची उत्पादकता वाढीची सूत्र वापरून खरीप हंगामाच्या कामास वेग द्यावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले.
बियाणे, खते, औषध खरेदी करताना शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी - बियाणे, खते, औषध खरेदी करताना शेतकऱ्यांनी परवानाधारक विक्रेत्याकडूनच पक्की पावती घेऊन खरेदी करावीत. त्या पावतीवर स्वतःची, दुकानदाराची (विक्रेत्याची) स्वाक्षरी आहे. याची खात्री करून घ्यावी. त्या पावतीवर लॉट नंबर, मालाची संख्या, वजन, परवाना नंबर, पॅकींग डेट, एक्स्पायरी डेट यांचा देखील उल्लेख असावा. यामुळे खते, बियाणे, औषध यांचा जो कायदा आहे त्या अनुषंगाने शेतकऱ्याला न्याय मागता येतो.