धुळे - एकीकडे दुष्काळामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाईचे संकट उभे आहे. असे असताना दुसरीकडे मात्र धुळे महापालिकेच्या जुन्या इमारतीत पाण्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी होत आहे. या ठिकाणी असलेल्या आस्थापना विभागाजवळ पाण्याची पाईपलाईन फुटली आहे. या समस्येकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे.
संपूर्ण धुळे जिल्ह्यात पुरेसा पाऊस झालेला नाही. मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडला आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विविध धरणे आणि तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नसल्याने शहराला ५ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच काही भागात तर टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. महापालिका निवडणुकीच्या वेळी भाजपने शहराला दररोज पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप शहराला नियमित पाणी पुरवठा सुरू झालेला नाही.
शहरात मोठ्या प्रमाणावर पाण्याची समस्या असताना दुसरीकडे मात्र जुन्या महापालिका इमारतीत आस्थापना विभागाजवळ पाण्याची पाईपलाईन फुटली असून मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे. विशेष म्हणजे याठिकाणी दिवसभर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वर्दळ असते. मात्र ते याकडे डोळेझाक करत असल्याचे चित्र आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई असताना दुसरीकडे अशा पद्धतीने वाया जाणारे पाणी थांबवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.