धुळे - जिल्ह्यातील शिरपूर येथे काही मद्यधुंद तरुणांनी डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ शिरपूर शहरातून मूकमोर्चा काढण्यात आला.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील नगरपालिकेच्या इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये मद्यधुंद अवस्थेत दोन युवक उपचारासाठी आले होते. सतीश तथा अतुल माळी तसेच हेमंत तथा सोनू कुंवर असे या युवकांची नावे आहेत. रूग्णालयात आल्यानंतर त्यांनी बोटाला ड्रेसिंग करून द्या, असे या डॉक्टरला सांगितले. त्यानंतर डॉक्टर वीरेंद्र पावरा यांनी या दोघांना अगोदर केस पेपर काढून घ्या, असे सांगितले. त्याचा या दोघा युवकांना राग आल्याने त्यांनी डॉक्टर वीरेंद्र पावरा यांना शिवीगाळ केली.
त्यानंतर डॉ. पावरा यांनी डॉ. दिनेश पटेल यांना फोन करून बोलावून घेतले. रुग्णालयात आल्यावर डॉ. पटेल यांनी त्या दोघा युवकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी डॉ. पटेल यांची कॉलर पकडून शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर मारहाण करणारे दोघे फरार झालेत. या घटनेच्या निषेधार्थ आज शिरपूर प्रांताधिकारी कार्यालयावर मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आणि निवेदन देण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी दोन संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.