धुळे - गुजरातमध्ये कापूस विकून घरी परतणाऱ्या व्यापाऱ्याच्या बॅगमधून चोरट्यांनी २ लाख ६६ हजारांची रोकड लांबविली. ही घटना धुळे बस स्थानकावर घडली असून बस स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज पाहणीत तिघेही चोरटे दिसून आले आहेत. याप्रकरणी कापूस व्यापाऱ्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
धुळे तालुक्यातील नंदाळे येथे राहणारा विकास पाटील हा गुजरातमध्ये कापूस विक्रीसाठी गेला होता. कापूस विक्रीतून मिळालेले ४ लाख ६६ हजार रुपये विकासने आपल्याजवळील चामड्याच्या बॅगमध्ये ठेवले आणि अहमदाबाद येथून अहमदाबाद-औरंगाबाद या गुजरात डेपोच्या बसने परतीचा प्रवास सुरू केला. पैसे ठेवताना त्याने बॅगमध्ये ठेवलेल्या ब्लँकेटच्या एका बाजूला २ लाख रुपये तर दुसऱ्या बाजूला २ लाख ६६ हजार ६६० रुपये ठेवले होते. धुळे बस स्थानकावर पोहोचल्यावर आपल्या गावी जाण्यासाठी विकास गिरणा डॅमकडे जाणाऱ्या बसची वाट पहात होते. दरम्यान बस आल्यावर आतमध्ये प्रवेश करताना गर्दी नसतानेही दोघा-तिघांनी विकासशी धक्काबुक्की करत बसमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बसमध्ये बसल्यावर विकासने आपल्या बॅगची तपासणी केली असता ती कापल्याचे त्याच्या लक्षात आले आणि बॅगमधील रोकडही चोरी झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी विकासने पोलीस ठाण्यात तक्रार केली असून दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
धक्काबुक्की करणाऱ्या व्यक्तींवर विकासला संशय
गर्दी नसतानाही बसमध्ये घुसण्यासाठी आपल्याला धक्काबुक्की करणारे ते अज्ञात व्यक्ती चोरटे असावेत, असा संशय विकासला होता. बस स्थानकात आल्यापासून पांढरे कपडे घातलेले लोक त्याच्या मागे फिरत असल्याचे विकासला दिसून आले होते. चहापाण्यासाठी बस स्थानकाबाहेर जातानासुद्धा ही अज्ञात व्यक्ती आपल्या मागे असल्याचे त्याला जाणवले. त्यामुळे बसमध्ये धक्कामुक्की करणाऱ्या त्या तीन व्यक्तींवर विकासला संशय आहे.
हेही वाचा- सीएए, एनआरसीविरोधात अल्पसंख्याक समाजाचे धुळ्यात धरणे आंदोलन