धुळे- विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून उमेदवारीकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. मात्र, धुळे शहरात आजही चर्चा आहे ती अनिल गोटे आणि राजवर्धन कदमबांडे यांच्या नावाची. या दोघांनीही अद्याप आपली भूमिका स्पष्ट न केल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.
संपूर्ण महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असणारी विधानसभा निवडणुकीची केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी घोषणा केली. या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असून आता कोणत्या पक्षाकडून कोण लढणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. धुळे विधानसभा मतदारसंघाकडे देखील संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून कोणत्या पक्षाकडून कोण उमेदवारी करेल याची सगळ्यांना उत्सुकता लागून आहे. मात्र, असे असले तरी या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची चर्चा सुरू आहे ती एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे अनिल गोटे आणि राजवर्धन कदमबांडे या 2 इच्छूक उमेदवारांची.
गेल्या निवडणुकीत अनिल गोटे यांनी भाजपच्या तिकिटावर उमेदवारी करत राजवर्धन कदमबांडे यांचा पराभव केला होता. मात्र, गेल्या पाच वर्षात अनिल गोटे यांचे भाजपशी बिघडलेले संबंध पाहता या निवडणुकीत अनिल गोटे कोणत्या पक्षाकडून उमेदवारी करतात याची सगळ्यांना उत्सुकता लागून आहे. तसेच आजवर राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक म्हणून राजवर्धन कदमबांडे यांची ओळख आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनिल गोटे शिवसेनेत तर राजवर्धन कदमबांडे भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरू आहे. मात्र, या दोघाही महत्त्वाच्या व्यक्तींनी अद्याप आपली कोणतीही भूमिका स्पष्ट न केल्याने राजकीय वर्तुळात चलबिचल सुरू आहे. धुळे शहराच्या विकासात अनिल गोटे आणि राजवर्धन कदमबांडे यांचे मोठे योगदान असून या निवडणुकीत हे दोघेही काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.