धुळे - शहरासह जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या चोरीच्या घटना रोखण्यात पोलीस प्रशासन पूर्णतः अपयशी ठरले आहे. शहरातील जय हिंद कॉलनी परिसरातील फुटवेअरचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी पंचवीस ते तीस हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
धुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चोरी, खून या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे विशेष पथकाची नियुक्ती देखील करण्यात आली आहे. मात्र या घटना सातत्याने घडत आहेत. धुळे शहरातील जय हिंद कॉलनी परिसरात असलेले लेदर फुटवेअर हे दुकान अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री फोडून दुकानातून ब्रँडेड कंपनीचे शूज तसेच चप्पल लंपास केले आहेत. दुकान मालक प्रकाश चावडा हे रात्री दुकान बंद करून घरी गेले असताना सकाळी आल्यावर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पोलीस प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन चोरीच्या घटना रोखण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.