धुळे - जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील रोहिणी शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारवाई करून १ लाख ८ हजार रुपयांचे स्पिरिट जप्त केले असून प्रकरणातील वाहनचालक पळून गेला आहे. २०० लिटर क्षमतेचे १० ड्रम आणि एक वाहन असा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे.
शिरपूर तालुक्यातील रोहिणी शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक गस्तीवर असताना अवैधरित्या स्पिरिटचा साठा असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. या माहितीनुसार पथकाने या शिवारात धाड टाकून कारवाई केली. या ठिकाणी (MH १८ E ७१६१) क्रमांकाचे संशयित वाहन आढळून आले. या वाहनाची तपासणी केली असता त्यात २०० लिटर क्षमतेचे स्पिरिटने भरलेले १०० ड्रम आढळून आले. या स्पिरिटची किंमत १ लाख ८ हजार रुपये आहे.
या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने स्पिरिट आणि ४ लाख रुपये किंमतीचे वाहन असा एकूण ५ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणातील वाहनचालक फरार झाला असून पुढील तपास सुरू आहे.