धुळे - मुख्यमंत्र्यांनी जळगावात कृषी विद्यापीठाची घोषणा करून आमच्या जखमेवर मीठ चोळले आहे. याचा आम्ही निषेध करतो, अशी टीका धुळे ग्रामीणचे शिवसेनेचे माजी आमदार शरद पाटील यांनी पत्रकारपरिषदेत केली. तसेच कृषी विद्यापीठ धुळ्यातच झाले पाहिजे, यासाठी शिवसेना कायम आग्रही राहील, असेही स्पष्ट केले.
पाटील पुढे म्हणाले, की भुसावळ येथे झालेल्या सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कृषी विद्यापीठ जळगावात होण्याबाबत वक्तव्य केले होते. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेचा धुळे जिल्हा शिवसेनेने निषेध केला आहे. मुख्यमंत्र्यांना एकनाथ खडसे यांचा पुळका आला असेल, तर त्यांनी खडसेंना मंत्रिमंडळात घ्यावे. एकनाथ खडसे यांनी मंत्री असताना शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. शरद पवार यांनी कृषी मंत्री आणि मुख्यमंत्री असताना जसे योग्य निर्णय घेतले, तसे निर्णय एकनाथ खडसे यांनी घेतले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांना ते डोईजड वाटू लागल्याने त्यांनी खडसेंवर खोटे आरोप करून त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढले.
कृषी विद्यापीठाबाबत घोषणा करून मुख्यमंत्र्यांनी आमच्या जखमेवर मीठ चोळले आहे, अशीही टीका धुळे ग्रामीणचे शिवसेनेचे माजी आमदार शरद पाटील यांनी पत्रकारपरिषदेत केली.