धुळे - शहरातील पांझरा नदीपात्रात अवैधरीत्या वाळूचा उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अप्पर तहसीलदार संजय शिंदे यांच्यावर वाळू उपसा करणाऱ्या कामगारांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
धुळे शहरातील पांझरा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा केला जातो. अवैधरीत्या चालणारा हा प्रकार रोखण्याचे प्रशासनासमोर आव्हान निर्माण झाले आहे. याबाबत वारंवार कारवाई करून देखील वाळू उपसा करणाऱ्यांवर कुठलाही परिणाम झालेला नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी शिरपूर तालुक्यात अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना मारहाण झाल्याची घटना ताजी असताना दुसरीकडे शनिवारी (दि. 4 जाने.) धुळे शहरात या घटनेची पुनरावृत्ती टळली.
हेही वाचा - धुळ्यात 70 लाख रुपयांचा दारूसाठा जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
शहरातील पांझरा नदी पात्रात अवैधरीत्या वाळूचा उपसा होत असल्याची माहिती अप्पर तहसीलदार संजय शिंदे यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे संजय शिंदे हे अवैध वाळूचा उपसा करणार्यांवर कारवाई करण्यासाठी गेले असताना त्याठिकाणी असलेल्या कामगारांनी महिलांना पुढे करून संजय शिंदे यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, याबाबत माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा - मनुस्मृतीचे दहन करुन धुळ्यात स्त्री मुक्ती दिन साजरा