धुळे - राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने तुटपुंजी मदत जाहीर केल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी याच्या निषेधार्थ दभाशी फाटा येथे रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
हेही वाचा... जळगावात दुचाकींची समोरासमोर धडक; एक ठार तर दोघे गंभीर
संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. मात्र राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार स्थापन न झाल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत वेळेवर मिळण्यात विलंब होणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आठ हजार रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे मदत जाहीर केली आहे. मात्र ही मदत अत्यंत अल्प असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
हेही वाचा... माध्यमिक शालान्त परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; दहावी 3 मार्च, तर बारावीची 18 फेब्रुवारी पासून 'परीक्षा'
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाने जी तुटपुंजी मदत जाहीर केली, त्याविरोधात दभाशी फाटा येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवर रस्ता रोको आंदोलन केले. हा रस्ता रोको शिंदखेडा पंचायत समिती चे माजी सभापती ललित वारुळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. तापी परिसरातील कमखेडा, हंबर्डे, विरदेल, मुडावद, जातोडे वारुड, दभाशी या गावातील अनेक सरपंच उपसरपंच व तरुण शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.