धुळे - विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुती 220 जागांवर विजय मिळवेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याला प्रगतीपथावर आणले आहे. गेल्या पाच वर्षात भाजप-शिवसेना महायुतीने जनतेचा विश्वास संपादन केला आहे. या निवडणुकीत आघाडीचे तिकीट घ्यायलाही कोणी तयार नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला जनता पुन्हा एकदा घरचा रस्ता दाखवेल, असा विश्वास खासदार रावसाहेब दानवे यांनी धुळ्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीची केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी घोषणा केल्यानंतर संपूर्ण राज्यात निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. ही निवडणूक महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाची असून सगळ्याच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार रावसाहेब दानवे यांची धुळ्यात पत्रकार परिषद पार पडली. यावेळी बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षात राज्याचा मोठ्या प्रमाणावर विकास केला आहे. उद्योग क्षेत्रातील सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात झाली असून राज्य प्रगतीपथावर पोहोचले आहे.
हेही वाचा- निवडणुकीच्या तोंडावर बच्चू कडू शिवसेनेच्या संपर्कात
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून निवडणुकीसाठी त्यांना उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे तिकीट घेण्यास देखील कोणीही तयार नसून भाजप-शिवसेना महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग होत आहे. या निवडणुकीत देखील 2014 च्या तुलनेत भाजप शिवसेना महायुती अधिक जागांवर विजय मिळवेल, असा विश्वास आम्हाला आहे.
खानदेशातील अनेक विद्यमान आमदार आमच्या संपर्कात
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपची युती होणार का ? याबाबत रावसाहेब दानवे म्हणाले युती निश्चित होणार असुन खानदेशातील अनेक विद्यमान आमदार आजही आमच्या संपर्कात आहेत. येत्या दोन दिवसात आम्ही त्यांची देखील यादी देऊ, अशी माहिती खासदार रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा- ‘हे वागणं बरं नव्हं’, साताऱ्यात पवारांचा उदयनराजेंना टोला