धुळे- 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकावरून वाद निर्माण झाला आहे. या पुस्तकाचे लेखक भगवान गोयल यांचा संपूर्ण देशभरातून निषेध व्यक्त होत आहे. या पुस्तकाच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा आणि राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या पुस्तकावर त्वरित बंदी आणावी, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.
हेही वाचा- 'सगळ्या प्रश्नांची उत्तरे शरद पवारांकडेच आहेत', म्हणून...
दिल्ली येथील भाजप कार्यालयात आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकात नरेंद्र मोदींची तुलना शिवाजी महाराजांसोबत करण्यात आली आहे. या पुस्तकावरुन संपूर्ण देशभरात संताप व्यक्त होत असताना या पुस्तकावर त्वरित बंदी आणण्याची मागणी केली जात आहे. या पुस्तकाच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा आणि राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निदर्शने करुन या पुस्तकाचा निषेध करण्यात आला. तर राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने पुस्तकाच्या लेखकाचे प्रतिकात्मक चित्राचे दहन करुन निषेध व्यक्त करण्यात आला. या पुस्तकावर त्वरित बंदी आणावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.