धुळे- मागील काही दिवसांपासून दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. या पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसच्यावतीने धुळे शहरातील क्लब समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा देशभर भडका उडाला आहे. येत्या काही दिवसात ही दोन्ही इंधने शंभरी गाठतील की काय? अशी स्थिती आहे. लॉकडाऊनमुळे जनता होरपळली असताना त्यात इंधन दरवाढीचा शॉक बसत आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेल दरवाढीचे दर शासनाने कमी करुन सामान्य जनतेला दिलासा द्यावा, यासाठी धुळे जिल्हा काँग्रेसच्या वतीने शहरातील क्यूमाईन क्लब समोर शासनाविरोधात घोषणाबाजी करत एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
7 जून पासून इंधनाच्या दरात दररोज वाढ होत आहे. शनिवारपर्यंतची ही दरवाढ पहाता पेट्रोलमध्ये प्रतिलिटर नऊ रुपये तर डिझेलमध्ये अकरा रुपयांची वाढ करण्यात आली आहे. देशभरात पेट्रोलची किंमत प्रति लिटर 87-88 रुपयांच्या पुढे गेली आहे. तर दिल्लीमध्ये डिझेल पेट्रोल पेक्षा जास्त महाग आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर नीचांकी पातळीवर असताना, त्याचा थेट फायदा सामान्य जनतेला दिला जात नाही. वास्तविक पाहता आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीचा विचार करुन देशांतर्गत इंधनाचे दर ठरविले जातात. त्यात सध्यातरी पारदर्शकता राहिली नाही.
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमती पाहता पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करुन सामान्य जनतेला त्याचा लाभ देणे सहज शक्य आहे. सर्वसामान्य जनता दुहेरी संकटात असताना, केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर कमी करुन सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने या आंदोलनाद्वारे करण्यात आली.