धुळे- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. शहरात लॉकडावूनची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस यंत्रणा झटत आहे. नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. मात्र, प्रशासनाच्या आवाहनाला धुळेकर नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात जागोजागी पोलीस तैणात आहेत. नागरिकांना घरातच थाबण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, तरीही प्रशासनाच्या आवाहनानंतरही शहरात येणाऱ्या नागरिकांची संख्या अद्यापही कमी झालेली नाही. शहरातील लहान पुलावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नागरिकांची तपासणी करूनच शहरात सोडले जात आहे. धुळे शहरातील ब्रिटिशकालीन पूल हा बंद करण्यात आला असून नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शहरातील लहान पूल मात्र सुरू ठेवण्यात आला आहे. तसेच, इतरही पूल बंद करण्यात आले आहेत.