धुळे - शहरातील महापालिकेच्या रुग्णालयात पुरेसा औषधसाठा उपलब्ध नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाचं याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. याठिकाणी येणाऱ्या रुग्णांना अनेकदा बाहेरून विविध प्रकारचे साहित्य आणि औषधे विकत आणावी लागत आहेत.
महापालिकेच्या रुग्णालयात सर्वसामान्य नागरिक आणि गोरगरीब नागरिक उपचार घेण्यासाठी येतात. याठिकाणी अतिशय कमी दरात त्यांच्यावर उपचार करून दिले जातात. मात्र, धुळे महापालिकेच्या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना बाहेरून औषधे आणि उपचारासाठी लागणारे साहित्य विकत आणावे लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
याठिकाणी पुरेसा औषध साठा उपलब्ध नसून ड्रेसिंगसाठी लागणारे साहित्य देखील उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. पावसाळ्यात अनेकांना गंभीर जखम झाल्यावर देण्यात येणारे इंजेक्शन देखील याठिकाणी उपलब्ध नाही. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे वारंवार तक्रार करून देखील औषधसाठा आणि लागणारे साहित्य उपलब्ध होत नसल्याचे येथील अधिकारी आणि कर्मचारी सांगत आहेत.
याबाबत येथील अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी बोलणे टाळले. मात्र, प्रत्यक्ष पाहणी केल्यावर याठिकाणी अनेक प्रकारच्या औषधांची आणि साहित्याची गरज असून ते उपलब्ध नसल्याचे समजले आहे. याबाबत वारंवार तक्रारी तसेच प्रसारमाध्यमांमधून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करून देखील याची दखल घेतली जात नसल्याचे समोर आले आहे.