धुळे - देशभर सुरू असलेल्या 'मॉब लिंचिंग' विरोधात इन्साफ आक्रोश मोर्चा संयोजन समितीने शहरातील गरुड वाचनालयासमोर आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात मुस्लीम समुदाय मोठ्या संख्येने सहभागी झाला आहे.
संशयातून जमावाकडून निष्पापांची हत्या होत असताना सरकार गप्प बसले आहे. अशा घटनांमुळे धार्मिक शांतता आणि सलोखा धोक्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर झुंडबळी विरोधात कठोर कायदा तात्काळ होणे गरजेचे आहे. या मागणीसाठी इन्साफ आक्रोश मोर्चाने हे आंदोलन सुरू केले आहे, अशी माहिती आंदोलनकर्त्या नागरिकांनी दिली.
भारतात धर्माच्या नावाखाली जमावाकडून निरपराधांना मारहाण करुन जीवे ठार मारले जात आहे. सर्व धर्माचे लोक आपापसात गुण्यागोविंदाने रहावे आणि धार्मिक उन्मादाचे बळी पडून निरपराध्यांना आपले प्राण गमवावे लागू नये, यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने या विरोधात कठोर कायदा करावा, अशी मागणी यावेळी मोर्चेकरांनी केली.