धुळे - शहराजवळील मोहाडी परिसरातील दंडेवालेबाबा नगरात गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या एका तरुणास मोहाडी पोलिसांनी अटक केली. या तरुणाकडून पोलिसांनी एक गावठी पिस्तूल आणि २ जिवंत काडतूस, १ मोटारसायकल असा सुमारे ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
धुळे शहराजवळील मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील हे आपल्या पथकासोबत मोहाडी परिसरातील दंडेवालेबाबा नगरात गस्त घालत होते. यावेळी त्यांच्या पथकाला मोहाडीतील सराईत गुन्हेगार विकी उर्फ विकास मोहन चौधरी याच्या घरी एक जण भेटायला येत असून त्याच्याजवळ गावठी बंदूक असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार पथकाने सापळा रचला. याठिकाणी एक तरुण संशयितरित्या फिरताना आढळून आला. त्याला पोलिसांनी हटकले. मात्र, तो पसार होण्याच्या तयारीत असताना अभिषेक पाटील यांनी त्याचा पाठलाग केला आणि त्याला नवीन म्हाडा वस्तीजवळ पकडले.
त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपले नाव सनी उर्फ विजय भगवान चौधरी असे सांगितले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि २ जिवंत काडतूस मिळून आले. या पिस्तुलाची किंमत ३० हजार रुपये असून मॅगझीनमधील २ काडतुसे त्यांची किंमत २४० रुपये आहे. एक गावठी पिस्तूल, २ जिवंत काडतूस आणि एक मोटारसायकल असा एकूण ६० हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सनी उर्फ भगवान चौधरी याला अटक केली आहे.