धुळे - मिशन बिगीन अगेन अंतर्गत संपूर्ण राज्यात बार व रेस्टॉरंट हे कालपासून सुरू करण्यात आले आहेत. मात्र, सार्वजनिक वाचनालय आणि अभ्यासिकांना बंद ठेवण्यात आले आहे. या अभ्यासिका आणि वाचनालय पुन्हा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आज धुळे शहरात आंदोलन केले.
धुळे शहरातील गरुड वाचनालयासमोर प्रतिकात्मक पुस्तक वाचन करत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून हे आंदोलन करण्यात आले. गोरगरीब विद्यार्थ्यांचे भविष्य या अभ्यासिका आणि वाचनालयांवर अवलंबून आहे. अभ्यासासाठी जागा नसल्याने या गरीब विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे शासनाने वाचनालय आणि अभ्यासिका सुरू कराव्यात, अन्यथा परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी मनसे विद्यार्थी सेनेने केली आहे.
विशेष म्हणजे शासनाने याबाबत निर्णय न घेतल्यास सविनय कायदेभंग करून वाचनालयाचे दारं उघडण्यात येतील, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने यावेळी दिला आहे.