धुळे - देशाचे जवान हुतात्मा होत असताना, कार्यक्रम घेऊन संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबीयांच्या भावनांना डागण्या देण्याचे काम केले, अशी टीका आमदार अनिल गोटे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. तसेच त्यांनी मनमाड-इंदौर रेल्वेमार्ग मंजुरी म्हणजे निव्वळ धूळफेक असल्याचेही सांगितले.
रेल्वे मार्गाचा प्रश्न आपल्या कालखंडात मार्गी लावण्याचे श्रेय पदरात पाडून घेण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्र्यांना खोट्या कार्यक्रमाचा आधार घ्यावा लागला. मात्र, प्रत्यक्षात मनमाड-इंदौर रेल्वेमार्गाला प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही, रेल्वे अर्थसंकल्पात ९ हजार ९०० कोटी रुपयांच्या तरतुदीसमोर केवळ १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तरतूद आणि मंजुरी या प्रशासकीय शब्दांचा अर्थही न कळणाऱ्या राज्यमंत्र्यांनी मात्र, कोट्यवधी रुपयांचा चुराडा करत फसवा कार्यक्रम घडवून आणला, अशी टीका आमदार अनिल गोटे यांनी केली आहे.