धुळे - मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणाविरोधी याचिका दाखल करणाऱ्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने धुळे येथे करण्यात आले. धुळे जिल्हा मराठी क्रांती मोर्चाच्या वतीने राज्य सरकार, केंद्र सरकार आणि विरोधी याचिकाकर्त्यांचा निषेध करण्यात आला. आतापर्यंत शांततेच्या मार्गाने झालेले आंदोलन यापुढे आक्रमक आणि तीव्र होईल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने नोकरी आणि 2020-21 या वर्षात शिक्षणामध्ये मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे राज्यभरातील मराठा समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे. धुळे शहरातील मनोहर चित्र मंदिराजवळील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आरक्षणिवरोधात याचिका करणाऱ्यांचा निषेध नोंदवत त्यांच्या पुतळ्याचे दहन केले. आरक्षण मिळवण्यासाठी केलेल्या आंदोलनात हुतात्मा झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
हेही वाचा-'केंद्र-राज्य यांच्यातील राजकारणामुळे मराठा आरक्षणाला स्थगिती'
आरक्षणाला दिलेल्या स्थगिती विरोधात आमचे आंदोलन सुरू आहे. 50 टक्के आरक्षणाची मर्यादा इतर राज्यांनी देखील ओलांडली आहे. मात्र, तेथे आरक्षण कायम आहे. राज्यातील 85 ते 90 टक्के मराठा समाज मागास आहे, या समाजाला आरक्षणाची गरज आहे आरक्षणाचा फायदा विद्यार्थ्यांना तसेच नोकरदारांना पदोन्नतीमध्ये होणार आहे. मात्र, आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने मराठा समाज हवालदिल झाल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली आहे. स्थगिती विरोधात राज्यभर मराठा समाज शांततेने मोर्चे काढत आहे. शासनाची भूमिका सुधारली नाही तर आमचे आंदोलन हे त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.