धुळे - विधानसभा निवडणुकीत विविध पक्षांच्या निष्ठावंतांनी केलेली बंडखोरी मतांचे विभाजन करण्यात यशस्वी होते का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे याचा फटका युतीसह आघाडीलाही बसणार असल्याची शक्यता आहे.
हेही वाचा - काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्टवादी युतीनं महाराष्ट्राचं नुकसान झालं - मोदी
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना यांची युती झाल्यानंतर पक्षांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला. काही ठिकाणी अपेक्षित जागा न मिळाल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आले. धुळे जिल्ह्यातील त्याचे उदाहरण म्हणजे शिरपूर तालुका, साक्री तालुका आणि शिंदखेडा तालुका. या सर्वच तालुक्यांमधील निष्ठावंत कार्यकर्त्यांना तिकीट मिळावे, अशी अपेक्षा होती. परंतु, पक्षाने आधी पक्ष नंतर व्यक्ती असा अजेंडा पुढे करत निष्ठावंत कार्यकर्त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
हेही वाचा - 'राज्य सरकारचा ५ वर्षातला कारभार म्हणजे फटा पोस्टर निकला झिरो'
शिरपूर तालुक्यातून डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांना भाजपने तिकीट न देता डावलल्याने नाराज जितेंद्र ठाकूर यांनी अपक्ष उमेदवारी करत प्रचाराला सुरुवात केली. त्यानंतर डॉ. जितेंद्र ठाकूर यांनी पक्षाला राजीनामा देत आपली घोडदौड सुरू ठेवली. तसेच साक्री तालुक्यातील निष्ठावंत कार्यकर्त्या मंजुळा गावित यांनी देखील अपक्ष उमेदवारी करत साक्री मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेत पक्षातून हकालपट्टी केल्याचे पक्षाच्यावतीने सांगण्यात आले आहे. तर, महायुतीचे उमेदवार शिंदखेडा तालुक्यातील उमेदवार जयकुमार रावळ यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत शिंदखेडामध्ये उमेदवारी अर्ज भरत आपला प्रचार सुरू केला. शिंदखेडा तालुक्यातून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनीदेखील बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी करत प्रचार सुरू केला,
शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांची धुळ्यात सभा झाल्यानंतर बंडखोरांवर निश्चित कारवाई करू, असे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे वृत्त समोर आले आहे. आता जिल्ह्यातील हे तीन बंडखोर नेते अपक्ष उमेदवारी करून किती मतांची विभागणी करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.