धुळे - लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेच्या पूर्वसंध्येला शिरपूर तालुक्यातील सावळदे फाट्याजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने एका वाहनातून अवैधरित्या नेली जाणारी दारू जप्त केली. याप्रकरणी पथकाने वाहन चालक तुषार संतोष पाटीलला ताब्यात घेतले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता काळात अवैध मद्यविक्री आणि दारू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. २३ मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार होता. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते. मात्र, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला गस्तीवर असताना सावळदे फाट्याजवळ एका सफारी कारमधून अवैधरित्या मद्याची वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने एमएच २० एजी ६३७८ क्रमांकाच्या सफारी वाहनाचा पाठलाग केला. या वाहनात पथकाला बिअरचे ५०० मिमीचे ५० खोकी आढळून आली.
याबाबत वाहनचालक तुषार संतोष पाटील याला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. याप्रकरणी पथकाने तुषार पाटील (वय २७, रा. मालपूर रोड दोंडाईचा ) याला ताब्यात घेतले आहे. पथकाने जप्त केलेला मद्य साठा १ लाख ८ हजार रुपयांचा असून वाहनाची किंमत २ लाख रुपये आहे. जप्त करण्यात आलेला मद्य साठा मध्य प्रदेशात विक्रीसाठी नेला जात होता. मात्र, तो चोरून महाराष्ट्र्रात आणण्यात आला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने दिली आहे.