धुळे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात राज्य परिवहन (एसटी) सेवा बंद करण्यात आली होती. ही आंतरराज्य बससेवा आजपासून (सोमवारी) सुरू झाली. सध्या महाराष्ट्र-गुजरात राज्यात धुळे-सुरत, शिरपूर-सुरत, दोंडाईचा-सुरत या मार्गांवर ही आंतरराज्य बससेवा सुरू करण्यात आली आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे आहे. यामुळे एका सीटवर एकच प्रवासी याप्रमाणे एका बसमध्ये केवळ 22 प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी आहे. लॉकडाऊनमुळे 23 मार्चपासून एसटीची सेवा ठप्प झाली होती. त्यानंतर साधारण पाच महिन्यांनंतर आजपासून एसटीची आंतरराज्य बससेवा पुन्हा सुरू करण्यात येत आहे. टप्प्याटप्प्याने अन्य आंतरराज्य मार्गांवरही बससेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक स्वाती पाटील यांनी दिली.
पाटील म्हणाल्या, प्रवाशांना एसटीत बसल्यानंतर देखील मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहता टप्याटप्याने अहमदाबाद, बडोदा, तसेच मध्य प्रदेशसाठी देखील आंतरराज्य बससेवा सुरू करण्यात येणार आहे.