धुळे : शहरालगतच्या साक्री रोडवरील शेतशिवारात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या विशेष पथकाने छापा टाकला आहे. यावेळी तब्बल 31 जुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. तसेच त्यांच्याकडून 30 लाखांचे साहित्य देखील जप्त करण्यात आले. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांची नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली. धुळे तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 जुलै रोजी रात्री 9 वाजता छापा टाकण्यात आला आहे. महिंदळे शिवारातील प्रसिद्ध हॉटेलच्या पाठीमागे 200 मीटर अंतरावर असलेल्या हिंमत शेवाळे यांच्या घराच्या उघड्या शेडमध्ये जुगाराचा अड्डा सुरू होता. पोलिस महानिरीक्षकांच्या विशेष पथकाने या क्लबवर कारवाई केली.
जुगार खेळणाऱ्यांची नावे : अमित सत्यपाल ब्रिजलाल, दिलीप अमृत भावसार, अशोक कृष्णा आघाव, रवींद्र छबु चौधरी, आनंद देवदत्त गांगुर्डे, भगवान भालचंद्र चौधरी, विनोद शिवाजी सोनवणे, दिनेश रमेश पाटील, पंढरीनाथ पांडुरंग मोरे, हेमराज वामन मराठे, धम्मरत्न गुलाब वाघ, चंदू अब्दुल खाटीक, सुरेश महादु बैसाणे, विलास जामसिंग देवरे, दिनेश दौलत वाघ, फिरोज शेख उडान, संदीप संतोष पाटील, महेंद्र गणपत गावडे, दत्तात्रय खंडू नेरकर, बिलाल सलीम पिंजारी, रितेश सुनील पटाईत, संजय बबनराव चव्हाण, सुशील अशोक साळवे, रिजवान अली अश्रफ अली सय्यद, अशोक चिंधा साळुंखे, राजू बोमटू पटाईत, गणेश मारुती अजळकर, मनोज मका वाडीले, भूषण सतीश सोनवणे, जगदीश रामचंद्र चव्हाण, संजय भटू हाके यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. ज्या पत्र्याच्या शेडमध्ये हा क्लब सुरू होता. त्याचा मालक हिम्मत शेवाळे हे फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
30 लाखांचा मुद्देमाल जप्त : जुगाराच्या अड्ड्यावरून पोलिसांनी तीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यात एक लाख 56 हजार 730 रुपये रोख, एक लाख 41 हजार रुपये किमतीचे 30 मोबाईल फोन, 14 लाख 65 हजार रुपये किमतीच्या 23 मोटरसायकली, बारा लाख रुपये किमतीचे दोन चार चाकी वाहने, 38 हजार रुपये किमतीच्या टेबल, खुर्च्या असा एकूण 30 लाख 730 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एलसीबी, पीआयची तडकाफडकी बदली : नाशिक महानिरीक्षकांच्या पथकाने धुळ्यात येऊन कारवाई केल्याने धुळे पोलिसांची चांगलीच झोप उडाली आहे. रात्री कारवाई केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पत्रकार परिषद घेऊन अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले. तसेच अवैध धंद्यांबद्दल माहिती मिळाली तर संबंधित पोलीस ठाण्यात किंवा 112 वर कॉल करावा, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. तसेच त्यांनी आपला मोबाईल क्रमांकही जाहीर केला आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यावर ठपका ठेवला असून, त्यांची नियंत्रण कक्षामध्ये तडकाफडकी बदली करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली आहे.
हेही वाचा - Four Wheller Theft Case: धुळे जिल्ह्यातून चोरलेली मालवाहू बोलेरो मध्यप्रदेशात सापडली, चोर मात्र फरार