धुळे - शहरातील पुलांची पुरामुळे पूर्णतः दुरवस्था झाली असून नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय. मात्र, स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या नावाखाली प्रशासनाकडून या रस्त्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. या रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करून देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
धुळे शहरातील पांझरा नदीला आलेल्या महापुरामुळे शहरातील तीनही पूल पुराच्या पाण्याखाली गेले होते. त्यामुळे पुलावरील रस्ते वाहून गेले आहेत. या घटनेस 15 दिवस उलटून देखील प्रशासनाकडून या रस्त्यांचे डागडुजीकरण झाले नसल्याने याचा प्रचंड त्रास नागरिकांना होत आहे. पुलावरून वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांना मोठी कसरत करावी लागत आहे. पुलाच्या दुसऱ्या बाजूस दवाखाने असल्याने रुग्णवाहिका देखील पुलावरून जाऊ शकत नसल्याने याचा फटका रुग्णांना बसत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. पुलावरील रस्त्याची डागडुजी करून वाहतुकीसाठी रस्ता लवकरात लवकर तयार करून देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.